खेड : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (GITM), लोटे येथील केमिकल इंजिनिअरिंग विभाग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स (IIChE) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ. के. एच. घरडा मेमोरियल’ राष्ट्रीयस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ व उद्योजक कै. डॉ. के. एच. घरडा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रासह राज्याबाहेरील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या एकूण १७ संघांनी सहभाग घेतला.
कठीण संकल्पनांवरील प्रश्न, चित्रांवर आधारित प्रश्न आणि गूढ स्वरूपाच्या फेऱ्यांचा समावेश असलेल्या चार आव्हानात्मक फेऱ्यांनंतर स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लोटे येथील संघाने द्वितीय क्रमांकासह १० हजार रुपये, तर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई येथील संघाने तृतीय क्रमांकासह ७ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. या कार्यक्रमाला घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटेचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट पी. बी. पाटील आणि विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड, लोटेचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट व्ही. व्ही. ढगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, केमिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. एस. जे. कुलकर्णी आणि रजिस्ट्रार एस. सी. मुंगटे उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुंबई येथील शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रज्ञा इंगळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथील पेट्रोकेमिकल विभागप्रमुख डॉ. संगीता मेटकर यांनी काम पाहिले.
केमिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. एस. जे. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक प्रा. व्ही. बी. सावंत आणि आयोजन सचिव प्रा. वाय. व्ही. ठाकरे यांनी स्पर्धेचे नियोजन व आयोजन केले. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, विश्लेषण क्षमता आणि स्पर्धात्मक कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.