खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) येथील इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे ज्ञानदीप विद्या मंदिराच्या शैक्षणिक गुणवत्तेचा नावलौकिक वाढला आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या परीक्षेत ज्ञानदीप विद्या मंदिराच्या निर्मय संजय पवार याने २८२ गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. भूमी रामचंद्र भिंगारे हिने २७८ गुणांसह राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक मिळवला असून राज्यात आठवे स्थान प्राप्त केले आहे. किरण राजाराम शिंदे आणि दक्ष सुनील निर्मल यांनी प्रत्येकी २७४ गुण मिळवत राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला असून राज्यात बारावे स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेला राज्यस्तरीय सन्मान हा त्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा गौरव मानला जात आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर व भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन व अनिल शिवदे, संस्था सदस्य रुपल पाटणे, सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदीप भडगावच्या गुणवंतांचा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार!
