चिपळूण : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या चिपळूण येथील काही तरुणांनी स्थापन केलेल्या सृजन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा नुकताच वीरेश्वर कॉलनी येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या बेडेकर सभागृहामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या हस्ते शानदार शुभारंभ झाला. यावेळी आमदार शेखर निकम तसेच वाशिष्टी दूध प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत यादव आणि देवगडचे सुप्रसिद्ध कविवर्य प्रमोद जोशी यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले व संस्थेचा आज पासून शुभारंभ झाला आहे असे प्रमुख अतिथींच्या वतीने जाहीर करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्ष मेघना गोखले यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद जोशी यांनी काव्यमय शैलीतून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निशिकांत तथा कांता कानिटकर नाट्य क्षेत्र, विश्वास तथा भाऊ काटदरे, निसर्ग क्षेत्र आणि कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर यांचाही त्यांच्या क्षेत्रातील यशस्वीतेबद्दल सन्मान करण्यात आला.
आमदार शेखर निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण चमत्कार दाखविल्याशिवाय लोक आपल्याला नमस्कार करत नाहीत, यामुळेच सृजन संस्थेने आपल्या कामाचा ठसा समाजामध्ये उमटवावा म्हणजे समाज आपोआपच सृजन संस्थेच्या कामाकडे आकर्षित होतील.
प्रशांत यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोकणामध्ये थोर कलावंत निर्माण झालेले आहेत यामागे त्या कलावंतांनी घेतलेली मेहनत आणि जिद्द दिसून येते. सृजन संस्था ही अशाच मेहनती लोकांची असून भविष्यात सृजन संस्थेचा वटवृक्ष होईल.
मुख्य अतिथी आदिती सारंगधर यांनी आपल्या मनोगतात बोलताना चिपळूण विषयी मला खूपच आत्मीयता निर्माण झाली आहे कारण येथील रसिक श्रोते आणि प्रेक्षक कलाकारांना नेहमीच उचलून धरतात. यामुळे मी भारावून गेले आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी आल्यावर मला माझ्या लहानपणात गेल्यासारखे वाटले.
याचवेळी चिपळूण मधील कलाकारांचा ऋतुनाद कार्यक्रम सादर केला. पुण्याचे निसर्ग अभ्यासक अनुज खरे यांना नागझिरा जंगल विविध ऋतूंमध्ये कसे वाटले याचे अनुभव ओंकार बापट, कलाकार अनिरुद्ध दडके केले. विविध ऋतूंची गाणी अनामय बापट, आशुतोष चितळे, आणि उत्तरा भागवत साडविलकर यांनी सादर केली. अमेय भिडे, सुधीर देवस्थळी, बालकलाकार आरुष कुडाळकर यांनी वाद्यांची साथ दिली. कार्यक्रमाचे संगीत नियोजन राहुल साडविलकर यांनी केले. मंगेश बापट, शशांक बापट, आनंद बापट, केतन मांजरेकर, मनोज भाटवडेकर, आदित्य जोशी, चिन्मय दीक्षित यांनी खूप मेहनत घेतली होती.