लोटे : विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकीय ज्ञानासोबत उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, आधुनिक व्यावसायिक कौशल्ये आणि बदलत्या व्यवसायविश्वाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल, खेड येथे ‘स्मृतीशेष पद्मश्री डॉ. के. एच. घरडा तज्ज्ञ व्याख्यानमाला – २०२६’ या उपक्रमाचे शिक्षक दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आज उत्साहात संपन्न झाले.

शैक्षणिक संस्था आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील दुवा अधिक दृढ करून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे ज्ञान व अनुभव मिळवून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. बदलत्या तंत्रज्ञान आणि व्यावसायिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या भविष्यातील संधींसाठी तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

या व्याख्यानमालेत १४ समकालीन क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व मानव संसाधन व्यवस्थापन, डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन, आर्थिक विश्लेषण, वित्तीय तंत्रज्ञान, डिजिटल विपणन, व्यवसाय विश्लेषण, उद्योग ४.०, पुरवठा साखळी व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, उद्योजकता, व्यवस्थापन माहिती प्रणाली, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, मुलाखत कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांचा समावेश आहे.

पहिल्या पुष्पात डॉ. अधिराज पवार यांनी ‘डिजिटल विपणन आणि नवउद्योजकता’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डिजिटल माध्यमांचा व्यावसायिक वापर, समाजमाध्यमांद्वारे व्यवसायाची ओळख निर्माण करणे, ग्राहकांशी संवाद आणि व्यवसायविस्तार याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी आरोग्यसेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फिजिओथेरपी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणल्याचा अनुभव डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी, उपलब्ध संधी, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर याबाबत त्यांनी स्वतःच्या अनुभवांतून मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या सत्राचा विशेष लाभ एमएमएस आणि एमसीए विभागातील विद्यार्थ्यांना झाला. डिजिटल विपणन आणि नवउद्योजकतेतील प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्यास त्यांना मदत झाली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. नितीन कोळेकर यांनी घरडा साहेबांच्या ध्येय व उद्दिष्टांना उजाळा दिला. यावेळी एमएमएस विभागाचे विभागप्रमुख प्रा. प्रथमेश तांबे आणि एमसीए विभागाच्या विभागप्रमुख प्रा. पूनम शित्याळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमासाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

एमएमएस विभागाचे विभागप्रमुख प्रा. प्रथमेश तांबे यांनी सांगितले की, या व्याख्यानमालेद्वारे विद्यार्थ्यांना १४ विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असून, येत्या प्रत्येक शनिवारी होणाऱ्या सत्रांतून त्यांना उद्योगविश्वातील बदल, आवश्यक कौशल्ये आणि करिअरच्या संधी समजून घेता येतील. पदवी घेतल्यानंतर “पुढे काय?” या चिंतेऐवजी “उपलब्ध संधींचा सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल?” हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, हे या उपक्रमाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून प्रा. सानिका शिंदे यांनी जबाबदारी सांभाळली.

‘शिका • जोडा • प्रगती करा’ या संकल्पनेतून सुरू झालेली ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक, उद्योजकीय आणि व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारी ठरणार आहे.