खेड : खेड-सातारा मार्गावरील रघुवीर घाटात कोसळलेली महाकाय दरड अखेर ४० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हटविण्यात आली. गुरुवारी रात्री ९.३० वाजता दरड कोसळल्याने हा मार्ग ठप्प झाला होता. दरडीतील मोठमोठे दगड व मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. या दरडीमुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरीशी संपर्क प्रभावित झाला होता. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

शुक्रवारी सकाळपासून जेसीबी व फोकलेनच्या साहाय्याने दरडीचा मलबा हटविण्याचे काम सुरू होते. मात्र, प्रचंड आकाराचे दगड यंत्राने हटविणे शक्य नसल्याने शनिवारी सकाळी ७.३० वाजता ब्लास्टिंग करण्यात आले. दगड फोडल्यानंतर जेसीबीच्या मदतीने मलबा हटवून सायंकाळी मार्ग खुला करण्यात आला.

हे काम उपकार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील व शाखा अभियंता निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. घाटात दरडीचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चालक-वाचकांची ग्रामस्थांकडून दोन दिवस व्यवस्था
अचानक दरड कोसळल्याने गुरुवारी खेडहून आकल्पेकडे गेलेली एसटी बस मार्ग बंद असल्याने परत येऊ शकली नाही. चालक व वाहक अडकल्याची माहिती मिळताच आराव येथील ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत निरपेक्षपणे दोघांची दोन दिवस अन्न, पाणी व निवासाची व्यवस्था केली.