चिपळूण : पेठमाप-गोवळकोट येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेले श्री गणेश मित्र मंडळ, पेठमाप गणेशवाडीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सल्लागार स्व. दीपक दत्ताराम निंबरे (मामा) यांचे गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पेठमाप-गोवळकोट परिसराने एक मनमिळाऊ, धार्मिक वृत्तीचा आणि खरा समाजसेवक गमावला असून, वाडीवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नसली, तरी त्यांच्याच संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या श्री बाळ गणेश गोविंदा पथक, पेठमाप गणेशवाडीने त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

काल मुसळधार पावसात दहीहंडी उत्सवादरम्यान पथकातील ९० हून अधिक गोविंदांनी एकत्र येत स्व. मामांचा फोटो असलेला बॅनर हाती घेत, ‘मामा, तुमचं स्वप्न पूर्ण करणार’ असा नारा दिला. पावसात भिजत दिलेली ही मानवंदना पाहून वाडीतील अनेकांचे डोळे पाणावले.

श्री गणेश मित्र मंडळाचे नेतृत्व श्री. प्रकाश जाडे यांनी सांभाळले. त्यानंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असताना, अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे दीपक निंबरे यांनी अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विस्कटलेली वाडी पुन्हा एकत्र बांधली. वाडीतील मंदिराच्या उभारणीतही त्यांचे विशेष योगदान होते.

श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या सेवेत, तसेच चिपळूण येथील नातू हॉस्पिटलच्या सेवाकार्यातही ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांचा स्वतःचा गणपती कारखाना होता.

त्यांनी लावलेले एकजुटीचे रोपटे आज ९० गोविंदांच्या निर्धारातून ‘मामांचं स्वप्न पूर्ण करणार’ या शब्दांतून दिसून येत आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली – श्री गणेश मित्र मंडळ व श्री बाळ गणेश गोविंदा पथक, पेठमाप गणेशवाडी.