चिपळूण (विशेष प्रतिनिधी) – कोकणातील सहकार क्षेत्रात सहकारतज्ज्ञ श्री. चव्हाण साहेब यांचे योगदान अपूर्व आहे. त्यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा वटवृक्ष लावला, वाढवला, जोपासला आणि आज तो बहरला आहे. याचे सारे श्रेय चव्हाण साहेबांबरोबरच संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, ठेवीदार, गुंतवणूकदार, सभासद व हितचिंतकांना जाते. हे प्रेम आणि विश्वास कायम जोपासला जाईल आणि त्याचबरोबर संस्थेची उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगती होत राहील या दृष्टीने आम्ही चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहू अशा शब्दात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी शुभेच्छा दिल्या.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषराव चव्हाण यांचा ७९ वा वाढदिवस संस्थेतर्फे साजरा केला जातोय. पतसंस्थेच्या सहकार भवनात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पतसंस्थेच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांनी प्रास्ताविक केले.
आपल्या प्रास्ताविकात त्या म्हणाल्या की, चव्हाण साहेबांच्या छत्रछायेखाली आम्ही कार्यरत आहोत. त्यांच्या तालमीत आम्ही सारे शिकलो आहोत. पतसंस्थेचे सारे सेवक हे केवळ कर्मचारी नसून एकाच परिवारातील सदस्य आहेत या भावनेतून ते सेवा करतात. आज संस्थेचे दीड लाखांहून अधिक सभासद असून १०० कोटींचे भांडवल आहे. १२०० कोटीहून अधिक ठेवी आहेत आणि तितकेच कर्जवितरणही झाले आहे. या आकडेवारीवरून सभासद, गुंतवणूकदार, ठेवीदार यांचा पतसंस्थेवर असलेला विश्वास स्पष्ट होतो. अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. या प्रेमातूनच आपली ‘आपली माणसे, आपली संस्था’ ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थ ठरते. असे त्यांनी नमूद केले. संस्थेचे काम अधिक पारदर्शक, स्वच्छ आणि लोकाभिमुख होत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला.
राज्यशासनाने महिलांना शेतकरी दर्जा दिला आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्यांना सहकाराच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले. सीईओ सौ. स्वप्ना यादव यांनी अत्यंत दमदारपणे आणि आत्मविश्वासपूर्वक संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतानाच सहकार कायदा, महिला सक्षमीकरण, श्री. सुभाषराव चव्हाण यांचे सहकार क्षेत्रातील योगदान या मुद्यांवर महत्वपूर्ण भाष्य केले.
