मंडणगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मंडणगड तालुक्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त,व नागरिक एस.टी. बसच्या माध्यमातून ये-जा करणार आहेत. या काळात मंडणगड एस.टी. स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी केली आहे.

यासंदर्भात देवळेकर यांनी मंडणगड एस.टी. आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन गणेशोत्सवापूर्वी स्थानकात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

स्थानकातील स्वच्छतागृहांची नियमित व पुरेशी स्वच्छता करण्यात यावी, स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा सुरळीत पुरवठा ठेवावा, प्रवाशांसाठी शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच स्थानक परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि नियमित साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने स्थानक परिसरातील स्वच्छता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देऊन त्यांना सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे, यासाठी आगार प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही देवळेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या गणेशभक्तांसह सर्व प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी आगार प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वीच तातडीने आवश्यक उपाययोजना करून सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अभिजीत देवळेकर यांनी व्यक्त केली आहे.