मंडणगड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणारे जिल्हा परिषद मराठी शाळा, तिडे-आदिवासीवाडी येथील उपशिक्षक निलेश तुळशीराम लोखंडे यांची शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत ‘जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार’ घोषित झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

तिडे-आदिवासीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते निलेश लोखंडे यांना शाल, पुष्पगुच्छ व गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी घेतलेले अथक परिश्रम, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व मूल्यांची रुजवणूक तसेच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेले योगदान या कार्याची दखल घेत त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कार घोषीत झाला आहे.

यावेळी अभिजीत देवळेकर यांनी निलेश लोखंडे यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असतो. आपल्या कार्यातून निलेश लोखंडे यांनी ही जबाबदारी निष्ठेने पार पाडत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांच्या भविष्याला दिशा देण्याचे कार्य केले आहे,” असे गौरवोद्गार काढले.

दुर्गम व आदिवासीवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षणासोबतच संस्कार व मूल्यांची जडणघडण व्हावी, यासाठी निलेश लोखंडे कार्य प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

“आपल्या कर्तृत्वाचा हा सन्मान, शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच अभिमान!” या शब्दांत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

या सन्मानामुळे तिडे-आदिवासीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक कार्याला तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.