चिपळूण – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त महाविद्यालयात मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लायन्स क्लब सावर्डे (आयडियल) आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डेरवण हॉस्पिटलच्या डॉ. रुपाली चव्हाण आणि डॉ. स्वाती सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे स्वागत डॉ. खोत यांनी केले…

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चव्हाण आणि डॉ. सोनवणे म्हणाल्या, आत्महत्या करणारी व्यक्ती एका दिवसात निर्णय घेत नाही. त्याआधी अनेक दिवस त्याच्या मनातील ताण-तणाव वाढत असतो. अशावेळी त्याला समजून घेणे, त्याचे समुपदेशन करणे आणि वेळीच रुग्णालयात दाखवून उपचार करणे महत्त्वाचे आहे. सतत गप्प बसणे, सतत रडणे, एकाकी राहणे ही मानसिक अस्वस्थतेची लक्षणे आहेत.

शरीराला फ्रॅक्चर झाले तर आपण उपचार करतो, तसेच मनाला फ्रॅक्चर झाले तर त्यावरही उपचार करणे गरजेचे आहे. निरोगी मन आणि मनाची स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ब्रेकअप होणे, नापास होणे, आर्थिक अडचणी, दीर्घ आजाराला कंटाळणे यांसारख्या कारणांमधून अनेक आत्महत्येच्या घटना घडतात. यापासून दूर राहण्यासाठी मनाची स्वच्छता राखा, आनंदी राहा, मैदानी खेळ खेळा आणि सोशल मीडियापासून काही काळ दूर राहा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तानाजी कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. जयसिंग चवरे यांनी केले. आभार डॉ. वर्षा खानविलकर यांनी मानले.
यावेळी प्रा. सुनील जावीर, प्रा. पूजा आवळे, प्रा. संकेत कुरणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.