राजापूर : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा वारसा जपत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा राजापूर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आयोजित ‘श्रावण महोत्सव’ श्री. विठ्ठल मंदिर, राजापूर येथे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. मंगळागौर आणि टिपरी नृत्याच्या सादरीकरणाने मंदिर परिसरात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष विनय गुरव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. राजापूर तालुक्यातील एकूण १२ महिला संघांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. सहभागी प्रत्येक नृत्य कलापथकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

मंगळागौर ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी जोडलेली केवळ पारंपरिक कला नसून महिलांच्या सामूहिक सहभागातून जपली जाणारी सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना सांस्कृतिक क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याला लोकसभा संपर्कसंघटक सौ. नेहा माने, जिल्हा संघटक सौ. वेदा फडके, तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी संतोष हातणकर, युवती सेना समन्वयक श्रुती कदम, तालुका महिला संघटक सौ. प्राची शिर्के, संगमेश्वर तालुका संघटक मेघना कदम, शहर संघटक वीणा विचारे, उपतालुका श्रद्धा नडे, प्रमिला कानडे, समीक्षा कुवेस्कर, श्रद्धा धालवलकर, सुहासिनी गुरव, युवासेना तालुका सुभाष नवाळे, नगरसेवक सुबोध पवार, नेहा तांनवडे, विभागप्रमुख नरेश शेलार, विभाग संघटक स्नेहा उगले, भामिनी सुतार, मीनाक्षी गुरव, संगीता चव्हाण, छाया कोकाटे, मनाली करंजवकर, धनश्री मांजरेकर, उपविभाग संघटक सुप्रिया हातणकर, सुनीता राजापकर, स्नेहा आपणकर, माजी पंचायत समिती सदस्य नलिनी शेलार, रोशनी धूरी, प्राजक्ता राऊत, शहर युवती प्रतीक्षा मांजरेकर, उपशहर गार्गी चिपटे, वैदेही गुरव, उपविभाग नामदेव नागरेकर, अशोक कार्षीगकर, सौ. मेघा गुरव, सिद्धी हातणकर, शाखाप्रमुख कृष्णा नागरेकर, संजय पेडणेकर, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे संदीप मालपेकर व भोगटे, जनकल्याण पतपेढीचे प्रकाश हातणकर, गणेश चिपटे आणि अमित मोंडे यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

“महिलांना व्यासपीठ द्या; पक्ष म्हणून आम्ही पाठीशी”

यावेळी मनोगत व्यक्त करताना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस यांनी महिला आघाडीच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमधून महिलांच्या कलागुणांना, उत्साहाला आणि सांघिक भावनेला व्यासपीठ देणारा हा खास सोहळा आहे. आता इथून पुढेही तुम्ही फक्त नियोजन करा. शंभर टक्के आम्ही पूर्ण संघटना म्हणून तुमच्या पाठीशी आहोत. हा कार्यक्रम दरवर्षी याहीपेक्षा मोठ्या उत्साहात आपण साजरा करू.”

महिलांच्या सामाजिक भूमिकेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, “घर, संसार, मुलं-बाळं, शेती याच्या पलीकडे तर महिलांचं आयुष्य नसतं, अशी सामाजिक चौकट आहे. पण या समाजाला घडवणारं आणि दिशा देणारं कोण असेल, तर ती महिला आहे. त्यामुळे तिचा सन्मान आपण केलाच पाहिजे.”

तसेच हा उपक्रम केवळ वर्षातून एकदा मर्यादित न ठेवता राजापूर शहर व तालुक्यात दर महिन्याला महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन त्यांनी केले. महिलांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पक्षसंघटना पूर्णपणे सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.