पोलादपूर- 75 वयापेक्षा अधिक वृद्धांना मोफत, महिला भगिनींना अर्ध तिकीट तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत पास अशा सुविधा देणाऱ्या एसटी महामंडळाचे स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या वर्षी सुरू झालेल्या लाल परीचे महत्त्व सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात कायम ठेवले आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो खार जमीन विकास व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
पोलादपूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या एसटी बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी पार पडला. त्यावेळी मंत्री गोगावले बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रादेशिक व्यवस्थापक सागर पळसुले, राज्य परिवहन मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता मीनल सोनवणे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रीडा व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, जि.प. सदस्य डॉ. निलेश कुंभार, पं. स.सभापती अविनाश शिंदे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्ष अस्मिता पवार व नगरसेविका तसेच शहरप्रमुख सुरेश पवार आणि ठेकेदार संजय चव्हाण तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री गोगावले यांचा सत्कार प्रादेशिक व्यवस्थापक सागर पळसुले व राज्य परिवहन मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता मीनल सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री गोगावले यांनी, दुर्गम भागातील प्रवासी जनतेच्या सोयीसाठी बसस्थानकामध्ये कायमस्वरूपी एक जादा बस उपलब्ध ठेवावी, आंबेनळी घाटातील महाबळेश्वरपर्यंत विद्यार्थी, एमआयडीसीतील नोकरदार तसेच लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठापर्यंत विद्यार्थी ये-जा करू शकतील अशी गाडी सुरू करावी, अशा स्थानिक जनतेच्या मागण्या पूर्ण करताना एसटी बस प्रशासनाने महामंडळामध्ये नोकर भरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत करणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी प्रादेशिक व्यवस्थापक सागर पळसुले यांनी या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. मंत्री गोगावले हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना या स्थानकासाठी निधी उपलब्ध झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्राधान्याने हे काम पूर्णत्वास देण्यास सांगितले आणि आज ही इमारत एसटी महामंडळाच्या प्रवासी जनतेसाठी उपलब्ध झाली आहे, असे यावेळी सांगितले.
पोलादपूरचे लोकनेते रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व अर्थसभापती चंद्रकांत कळंबे यांनी, तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील प्रवासी वर्गाच्या समस्या एसटी महामंडळाने सोडवण्याची आवश्यकता असून तालुक्याचा चेहरा आज या बसस्थानकामुळे उजळला असला तरी प्रवासी सुविधांमध्ये आणि बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे. बसफेऱ्यांअभावी औद्योगिक कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. बसस्थानकातील स्वच्छता आणि प्रवासी जनतेशी वागणूक चांगली झाल्यास पूर्वीप्रमाणेच मोठ्या संख्येने प्रवासी लालपरीचा उपयोग करतील, असे मत व्यक्त केले.
यावेळी मंत्री गोगावले यांनी अपेक्षा व्यक्त केल्यानुसार प्रादेशिक व्यवस्थापक सागर पळसुले यांनी आंबेनळी घाटातील रस्ता वाहतुकीसाठी सक्षम असल्याची पाहणी करण्यासाठी अनुकूलता दर्शविली.
