जालना : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रात्री उशिरा जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पोहोचले.

यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली. मात्र, सरकारची बाजू मांडली जात असल्याने मनोज जरांगे काहीसे वैतागले.

‘तुम्हाला सरकारची बाजू घ्यायची आहे का?’ असा सवाल मनोज जरांगे यांनी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना केला. त्यावर ‘ते माझे कामच आहे,’ असे मित्तल यांनी सांगितले.

यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारमुळे चांगल्या-चांगल्यांवर फाशी घेण्याची वेळ आल्याचे म्हटले. जरांगे पाटील वारंवार या मुद्द्यावरून शासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा नेमका संदर्भ जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना लक्षात आला नसल्याचे दिसून आले.

बहुधा मनोज जरांगे यांच्या बोलण्याचा रोख आपल्या दिशेने असावा, असे मित्तल यांना वाटले. त्यानंतर जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी, ‘मनोजजी, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,’ असे वक्तव्य केले.