मुंबई : काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिकमधील १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोपाचा कार्यक्रम झाला. दिनांक २४ ऑगस्ट पासून हे शिबिर सुरु होते. राहुल गांधी यांचे सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शोभा बच्छाव, जयश्री थोरात, यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर राहुल गांधी यांनी एमटीडीसी रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या शिबिरस्थळी राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, रेहाना चिश्ती, वामशी रेड्डी उपस्थित होते.
या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यानंतर शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला तसेच संगठन विस्तार व काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्याक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील आंदोलनकारी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला.
