रत्नागिरी : पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा सण धार्मिक उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून भव्य जुलूस काढण्यात आले. या दोन्ही जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांसह आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

पारंपरिक पोशाख परिधान करून तसेच हातात इस्लामी ध्वज घेऊन नागरिक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. धार्मिक घोषणा आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे शहरात सर्वत्र ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सवमय माहोल निर्माण झाला होता.

शहरातील दोन्ही जुलूस नियोजित मार्गाने मार्गस्थ झाले. जुलूसदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही जुलूस शांततेत आणि सुरळीतपणे पार पडले.

या उत्सवाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. शहरातील विविध भागांतून नागरिकांनी जुलूसमध्ये सहभागी होत ईद-ए-मिलादुन्नबीचा सण भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला.