पोलादपूर- गेल्या दोन निवडणुकांनंतर जनतेने पोलादपूर नगरपंचायतीत शिवसेनेला सत्ता दिल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वाधिक विकास निधी पोलादपूर नगरपंचायतीलाच उपलब्ध करून दिला असून तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रभागातील जनतेच्या अडीअडचणी अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या नगरसेवकांचा पत्ता कापला जाईल, अशी स्वपक्षिय नगरसेवकांना तंबी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली. यावेळी नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्यांना सर्वाधिक मतदार असूनही फक्त महायुती म्हणून तुमचा आमदार बनवला हे विसरू नका, अशी जाणीव करून सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन केले.

पोलादपूर नगरपंचायतीतील १ कोटीच्या नमो उद्यान, ३० कोटींच्या नळपाणी पुरवठा योजना भुमिपूजनासह आपला दवाखानाचे लोकार्पण राज्याचे रोहयो, खारजमीन विकास आणि फलोद्यान मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते रविवारी दुपारी करण्यात आले. यानंतर जनसेवा प्रतिष्ठानच्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री गोगावले यांचा छत्रपती शिवाजीनगर रहिवाशांनी खारीक-खोबऱ्याचा हार घालून सत्कार केला.

यावेळी मंत्री गोगावले यांच्यासोबत पोलादपूर नगराध्यक्षा अस्मिता पवार, उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती व सत्ताधारी नगरसेवक, विरोधी गटनेते दिलीप भागवत व विरोधी नगरसेवक, राजिप सभापती चंद्रकांत कळंबे व राजिप सदस्य डॉ. निलेश कुंभार, पं.स.सभापती अविनाश शिंदे व सदस्य अनिल दळवी, संपर्क प्रमुख किशोर जाधव, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार तसेच शिवाजीनगर येथील माजी नगराध्यक्ष निलेश सुतार, माजी सरपंच शिरिष साबळे, माजी प्रभारी राजिप सदस्या कांचनताई बुटाला, डॉ. गुलाब सोनावणे, मुख्याधिकारी विनय शिपाई, जनसेवा विद्यालयाचे मिलींद शहा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री गोगावले यांनी, पोलादपूर नगरपंचायतीतील विविध रस्ते, जनसेवा शाळेला क्रीडांगण व अंतर्गत सोयी सुविधांसाठी पाठपुरावा करून निधीची उपलब्धता करण्याचे काम सातत्याने केले म्हणून चंद्रकांत कळंबे आणि मला जनतेने चारवेळा निवडून दिले. एसटी स्थानकाची सुसज्ज इमारत, सावित्री नदीलगत संरक्षण भिंत, मटन मार्केटजवळ संरक्षक भिंत तसेच अंतर्गत रस्ते, गटारे व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता येत्या काळात प्रयत्न केले जातील, घनकचरा पोलादपूर येथून कातळी भोगावच्या हद्दीत नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाजीनगरच्या रस्त्याचे डांबरीकरण करून स्वातंत्र्यसैनिक डी.जी.साबळे यांचे नांव देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

पोलादपूर नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, सोनल गायकवाड, मृगया शहा, विरोधी नगरसेविका श्रावणी शहा, भाजप नगरसेविका अंकिता निकम, माजी नगराध्यक्ष नागेश पवार, प्रकाश गायकवाड, सिद्धेश शेठ, प्रसाद इंगवले, निखिल कापडेकर, माजी उपसरपंच मंगेश नगरकर, तुर्डेबुवा, राजन धुमाळ, एड. सचिन गायकवाड, शैलेश तलाठी, सुनील भोसले व जान्हवी मोरे तसेच अन्य प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.