चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेनंतर विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला असून, अलोरे येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन वसाहतीतील ३३ घरांचे शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी अचानक अलोरे येथे भेट देत या पुनर्वसन वसाहतीची पाहणी केली. घरांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पुनर्वसन प्रक्रिया आणि घरांच्या वाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

अलोरेत पालकमंत्र्यांचे जोरदार स्वागत

पालकमंत्री उदय सामंत यांचे अलोरे विश्वकर्मा चौक येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. विनया झगडे आणि पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, कपिल शिर्के यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अलोरे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमोद महाजन आणि मनीष गांगण यांनी पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली.

तिवरे धरण दुर्घटनेच्या जखमा आजही अनेकांच्या मनात ताज्या असताना, धरणग्रस्तांसाठी अलोरे येथे उभारण्यात आलेली घरे त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने मोठा दिलासा मानला जात आहे. १२ सप्टेंबरला होणाऱ्या लोकार्पणानंतर प्रत्यक्ष घरवाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन धरणग्रस्त कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष आता या कार्यक्रमाकडे लागले आहे.