चिपळूण : चिपळूण मोबाईल व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री साई मोबाईल, खेर्डीचे मालक ओंकार मोरे यांची दणदणीत विजयासह निवड झाली आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
चिपळूण, गुहागर आणि खेड या तीन तालुक्यांतील मोबाईल व्यावसायिक सभासद या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी निखिल किल्लेकर आणि ओंकार मोरे हे दोन उमेदवार इच्छुक होते. यासाठी झालेल्या निवडणुकीत ओंकार मोरे यांनी एकतर्फी विजय मिळवत अध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली.
विजयाची घोषणा होताच ओंकार मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक होत पुष्पहार अर्पण केला. यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. विजयाच्या आनंदात परिसर घोषणांनी आणि उत्साहाने दुमदुमून गेला.
मोबाईल व्यावसायिक क्षेत्रातील तरुण आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ओंकार मोरे यांच्या निवडीचे विविध सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“व्यावसायिकांचे प्रश्न सोडवणे, संघटना अधिक सक्षम करणे आणि मोबाईल व्यावसायिकांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करणे, हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहील,” अशी भावना अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओंकार मोरे यांनी व्यक्त केली.
चिपळूण मोबाईल व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी झालेल्या या निवडीमुळे संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.