चिपळूण : साई प्रतिष्ठान, खेर्डी, चिपळूण यांच्या सौजन्याने आणि श्री. नितीन ऊर्फ अबू ठसाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साह, जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाला. या उत्सवाला नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच दहीहंडीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोफळी येथील जय महाकाली गोविंद पथकाने ही हंडी फोडून विजेतेपदाचा मान मिळवला. आमदार शेखर निकम व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे हस्ते विजेत्या मंडळांना रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेतील दहीहंडी उत्सवातून उत्साह, साहस, एकजूट, संघभावना आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. साई प्रतिष्ठानचे आधारस्तंभ तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण तालुकाध्यक्ष आणि यादव चॅरिटी ट्रस्टचे ट्रस्टी मा. नितीन ऊर्फ अबू ठसाळे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली सलग पाचव्या वर्षी हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवाच्या आयोजनात श्री. नितीन ऊर्फ अबू ठसाळे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, चिपळूण तथा साई प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, श्री. संतोष कोकरे अध्यक्ष आणि श्री. प्रशांत सागवेकर खजिनदार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाला मा. प्रसाद सागवेकर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच तसेच मा. गणेश भुरण, खेर्डी गण अध्यक्ष यांचेही सहकार्य लाभले.

उत्सवाच्या आयोजनात सचिन कुंभार, सचिन ठसाळे, अण्णा जाधव, बाबू गोरीवले, मंगेश पवार, आसिफ भाई पठाण, अभि खरावते, स्वप्निल कुंभार, महेंद्र कुऱ्हाडे, भाऊ भुरण, महेंद्र भुरण, शशी भुरण, नवनाथ जाधव, समीर भुरण, शशिकांत भुरण, दत्तू भरण, मकरंद पंदेरे, मुन्ना कुंभार, प्रकाश खरावते, निलेश पवार आणि ईश्वर सोळंखी यांनी सहकार्य केले.

पाच वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची परंपरा

साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सलग पाच वर्षांपासून दहीहंडी उत्सवासोबत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. खेर्डी परिसरासह इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून, लावलेल्या वृक्षांची नियमित जोपासना व संगोपनही करण्यात येत आहे. विशेषतः कराड हायवे रोडलगत लावलेल्या वृक्षांची देखभाल सातत्याने केली जात आहे.

शिक्षण क्षेत्रातही प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत खेर्डी मराठी शाळेसह इतर गावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे वह्यांचे वाटप केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना चप्पल वाटप करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात मदतीचा हात देण्यात आला.

तसेच इयत्ता दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.

विजेत्या गोविंदा पथकाला ५१ हजारांचे पारितोषिक

यंदाच्या दहीहंडी उत्सवातील विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल ₹५१,०००/- चे भव्य पारितोषिक ठेवण्यात आले होते. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी-
५ थरांसाठी ₹२,०००/-
६ थरांसाठी ₹२,५००/-
७ थरांसाठी ₹३,५००/-
८ थरांसाठी ₹५,०००/- अशी पारितोषिके देण्यात आली.

लहान मुलांच्या गोविंदा पथकास ₹२,०००/- तर महिला गोविंदा पथकास ₹३,०००/- रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच फिरता मनोरा सादर करणाऱ्या पथकांमध्ये समाजोपयोगी संदेश देणाऱ्या पथकाला ₹३,५००/- चे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

लकी ड्रॉ ठरला विशेष आकर्षण

उत्सवात उपस्थितांच्या आनंदात भर घालण्यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम विजेत्यास फ्रिज, द्वितीय विजेत्यास एलईडी टीव्ही आणि तृतीय विजेत्यास एअर कूलर फॅन अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून पेशवाई पाच साड्यांचाही लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.

लाईट शो, डीजे आणि ऑर्केस्ट्राची रंगत

दहीहंडीप्रेमींच्या मनोरंजनासाठी लाईट शो, पुणे येथील डीजे स्टार मिस डॉली आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा शोचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण यांच्यातर्फे वैद्यकीय आरोग्य पथकाची व्यवस्था करण्यात आली होती.

दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून ‘शिस्त, सुरक्षितता, सामाजिक भान, उत्साह आणि एकजूट’ या पंचसूत्रीचा संदेश देण्यात आला. सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक उत्सव यांचा सुंदर संगम साधणारा हा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न झाला.