चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या मासिक सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर सदस्यांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या आठ महिन्यांपासून वारंवार सूचना देऊनही खड्ड्यांची परिस्थिती ‌‘जैसे थे‌’ असल्याचा आरोप सदस्यांनी केला. याशिवाय एसटी वाहतूक, शौचालयांची अस्वच्छता, भूमिअभिलेख, कृषी विभाग, दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा योजना आणि शिक्षण विभागातील समस्यांवरही सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
चिपळुण पंचायत समितीची मासिक सभा 14 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती सुर्यकांत खेतले यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी उमा घारगेपाटील यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती संदेश आयरे, सहाय्यक बीडीओ अविनाश केळसकर व पंचायत समिती सदस्य आणि शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याचे अधिकारी सांगतात; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही. आपण स्वतः 50 हजार रुपये खर्च करून खड्डे भरल्याचे पंचायत समिती सदस्या सुप्रिया वंजारे यांनी सभेत सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती सदस्यांच्या सूचनांना महत्त्व देत नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
सदस्यांनी वारंवार उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काय कारवाई झाली, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, तर सभेला यायचे कशासाठी, असा सवाल सुभाष जाधव यांनी उपस्थित केला. अधिकारी थातूरमातूर उत्तरे देतात, ठोस उत्तर मिळत नाही आणि कारवाईही होत नाही, तर चर्चा करणे निरर्थक आहे. सदस्यांना स्वतःच्या पैशांतून रस्त्यांची कामे करावी लागत असतील, तर संबंधित विभागाचा काय उपयोग, असा प्रश्न विनोद झगडे यांनी केला.
महसूल विभागाचे अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांनी सभेतूनच तहसीलदारांशी संपर्क साधला. त्यावेळी तहसीलदारांनी, तुमच्या बैठकीला उपस्थित राहणे आम्हाला बंधनकारक नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सक्ती करू शकत नाही, असे उत्तर दिल्याचे उमा घारगे-पाटील यांनी सभेत सांगितले..
कामथे उपजिल्हा रुग्णालयातील युरिन पॉटमध्येच घाण, गुटख्याची पाकिटे आणि खरकटे टाकले जात असल्याचा मुद्दा विनोद भुरण यांनी मांडत काही वेळा पाणी उपलब्ध नसते, स्वच्छता केली जात नाही, तसेच ड्रेनेज चोकअप होण्याचे प्रकार घडतात, असे भुरण यांनी सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या असून लवकरच काम केले जाईल, असे संबंधित डॉ. चिन्मय जाधव यांनी सांगितले.
जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे नेमके काय झाले, याचे सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे विनोद झगडे यांनी सांगितले. काही मोजक्या ठेकेदारांनी कामे पूर्ण केली असून इतरांनी केवळ पैसे घेऊन कामे अर्धवट ठेवली आहेत असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अनेक ठिकाणी योजना रखडल्या असून या कामांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.