खेड : धर्मांतर कायद्याच्या आडून सरकार संविधानावरच घाला घालण्याचे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करत प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी खेड येथे झालेल्या पहिल्या कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात जोरदार टीका केली. खरात प्रकरणावर सडकून हल्ला चढवत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या की, देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असून लोकशाही मूल्यांवर दबाव आणण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा वेळी सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी साहित्यिक, कवी आणि कलावंत यांच्यावर अधिक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. “विद्रोही विचारांची परंपरा जपण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची गरज आहे. त्यामुळेच कोकणातील या ऐतिहासिक संमेलनाला उपस्थित राहणे आवश्यक वाटले,” असेही त्यांनी स्पष्ट केले. खेड येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या विद्रोही साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. संमेलनात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर परखड मते मांडण्यात आली.
महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीस समर्पित कोकण बुध्द धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन खेड (रजि.)या संस्थेच्या वतीने आयोजित व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून १ले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रविवार येथील फुले शाहू आंबेडकर साहित्य नगरी स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे विचार मंथनाच्या वातावरणात उत्साहात पार पडले. नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेतील चित्ररथाने सांस्कृतिक विचार यात्रा खेड एस टी स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाजार पेठेतून तीनबत्ती नाका जवळील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व संमेलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्तूतीपर “दैवत छत्रपती” गीत सादर केले. कोकण बुध्द धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन खेड (रजि.)या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येसोंडे व सचिव सचिन मोहिते यांनी प्रमुख पाहुण्या आदरणीय प्रा.अंजलीताई आंबेडकर, संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.आशालता कांबळे, उद्घाटक प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष -ॲड. तु. ल. डफळे,प्रा.संदिप गमरे, संयोजन समिती अध्यक्ष -संजय कासारे, सुधीर भोसले,डॉ. रोहिदास जाधव,, डॉ. राहूल निकम,ॲड.संदेश मोरे,भाई अशोक मोरे,काकासाहेब जोयशी आदी विचार पिठावर विराजमान होते. प्रा.अंजलीताई आंबेडकर,प्रा.प्रतिमा परदेशी,प्रा आशालता कांबळे यांनी पारंपरिक चौकट मोडत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन केले.
प्रास्ताविक -श्रीकांत सकपाळ ,आभार -रविउदय जाधव यांनी केले. मुजफ्फर सय्यद यांच्या ” ईद मिलन ” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.शिवशाहिर विठोबा साळवी व सहकारी यांनी पोवाडा सादर केला. प्रख्यात जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक ज. वि. पवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रा.संदिप गमरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.मानपत्र वाचन सौ. वैशाली गोरे यांनी केले.
तिसऱ्या सत्रात धर्म, संस्कृती संविधान आणि मराठी साहित्य या विषयावर परिसंवाद झाला. प्रा.निळखंठ शेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉ. शिवाजीराव गोपाळे , मुजफ्फर सय्यद,प्रा डॉ सोमनाथ कदम यांनी आपले विचार मांडले,
सायंकाळी कवी संमेलन रंगले. देवानंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसहून जास्त कवी व कवयित्रीनीं सहभाग घेतला.विविध ठरावाचे वाचन ॲड. संदेश मोरे, बाबाराम पवार, रामचंद्र कदम, हर्षवर्धन मोरे,डि. ए. जाधव आदिंनी ठराव मांडले.
सुत्रसंचलन -किशोर धुत्रे यांनी केले.
धर्मांतर कायद्याच्या आडून संविधानावर घाला ? – प्रा. अंजली आंबेडकर यांचा सरकारवर घणाघात
