खेड : – तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये टँकर चालकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात एका चालकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप चंद्रभान सिंह (वय ३३, रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) हे ६ जून २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विनती कंपनीच्या पार्किंगमध्येआपल्या टँकरमध्ये बसले होते. यावेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही टँकर चालकांनी आपल्या वाहनांना
सुरक्षेसाठी लाकडी ठोकळे लावले नसल्याचा व्हिडिओ सिंह यांनी तयार करून ट्रान्सपोर्ट कार्यालयात पाठवला व तक्रार केली, असा संशय इतर चालकांना आला. या गैरसमजातून आरोपी नीरज मिश्रा आणि मनोज पांडे यांनी सिंह यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर संतापाच्या भरात दोघांनी लाकडी दांडक्याने सिंह यांना बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत सिंह यांच्या शरीराला दुखापत झाली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर संदीप सिंह यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली.