चिपळूण : शहरातील पेठमाप येथे शेतकरी इम्तियाज मुकादम यांनी ३० गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या सुमारे ७०० शेवगा झाडांची (शेतीची) पाहणी आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली.
आमदार भास्करशेठ जाधव हे स्वतः शेतकरी असून त्यांना शेतीचा अनुभव आणि जाण असल्याने त्यांनी यावेळी शेवगा पिकासाठी आवश्यक असलेल्या खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेती करताना येणाऱ्या विविध अडचणींबाबत चर्चा करून वानर व माकडांमुळे होणाऱ्या उपद्रवाबाबतही मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र शासनाकडून वानर व माकड पकडण्यासाठी प्रत्येकी ६०० रुपये मानधनाची तरतूद करण्यात आल्याची सविस्तर माहितीही आमदार भास्कर शेठ जाधव यांनी दिली.
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही शेवगा शेतीचा हा नवीन प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी करून त्याची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करत आमदार भास्कर शेठ जाधव यांनी शेतकरी इम्तियाज मुकादम यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार भास्कर शेठ जाधव यांच्यासोबत नगरसेवक फैसल कासकर, नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर आणि जफर कटमाले उपस्थित होते.
