चिपळूण : चिपळूण मधील मानाचा असलेला चिपळूणचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य मूर्तीचे स्वागत काल आगमन मिरवणुकीने झाले. पारंपरिक वाद्यांसह संबळ वाद्यांनी यावेळी गर्दीचे लक्ष वेधले. डीजेच्या तालावर तरुणाने चांगलाच ताल धरला. चिपळूण मधील वडनाका येथील एकविरा मंदिर शेजारी या मूर्तीची स्थापना केली जाते.

आगमन मिरवणुकीची सुरुवात मार्कंडी येथील श्री साई मंदिरापासून वेस मारुती मंदिर चिंचनाका ते वडनाकापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये चिपळूणचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक कार्यकर्ते नव्या टी-शर्ट सह अनोख्या लुक मध्ये पाहायला मिळाले. मिरवणुकीमध्ये शहराच्या आजूबाजूचे कार्यकर्ते आणि भाविक देखील सामील झाले. चिंचनाक्यामध्ये मिरवणूक आल्यानंतर महिला गोविंदा पथक तर्फे मनोरा रचून आगळीवेगळी सलामी देण्यात आली. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, नगरसेवक निहार कोवळे, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंड्याशेठ पेडणेकर, बंधू कदम, आकाश कदम, बाळा गुरव, तुषार गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.