चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिपळूण व आ. शेखर निकम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. चिपळूणच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच ठिकाणी २० दहीहंड्या फोडण्याचा विक्रम करण्यात आला.

शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी अजिंक्य आर्केड, शिवाजी चौक (चिंचनाका) येथे सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत हा उत्सव रंगला. मुसळधार पाऊस असूनही हजारो चिपळूणकरांनी गर्दी केली होती.

कार्यक्रमाची सुरुवात हंडीची विधिवत पूजा व नारळ फोडून करण्यात आली. यावेळी क्रेनच्या साहाय्याने सजवलेल्या २० हंड्या उभारण्यात आल्या होत्या. विविध भागांतून आलेल्या गोविंदा पथकांनी एकापाठोपाठ एक थर लावून हंड्या फोडत उपस्थितांची मने जिंकली. पावसात भिजतही गोविंदांनी दाखवलेले थरारक कौशल्य पाहून प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला मान, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याने रंगत वाढवली.

हा उत्सव मा. अजितदादा पवार व मा. सुनेत्राताई पवार यांच्या आशीर्वादाने तसेच आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सर्व राजकीय पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बंधूंनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिपळूण व शेखर निकम मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आमच्या कामाची पावती आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा मोठा उत्सव घेऊ,” अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.