खेड ( दिवाकर प्रभु ) : -. कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, वंदे भारत, जनशताब्दी आणि मडगाव वांद्रे एक्स्प्रेस या गाड्यांना मे महिन्यापासून खेड रेल्वेस्थानकावरील आरक्षण कोटा २ एसी, ३ एसी, ३ ई या तिकिटांच्या कोट्यात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे.
जल फाउंडेशनतर्फे १५ ऑगस्ट, २०२५ ला खेड येथे झालेल्या लाक्षणिक उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांसाठी आरक्षण कोटा वाढवण्याची प्रमुख मागणी होती. गोव्यातून सुटून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये सर्व स्थानकांना समान कोटा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला काही प्रमाणात यश मिळाले असून कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांसाठी निर्धारित केलेला आरक्षण कोटा जवळजवळ दीड पटीने वाढवला आहे. यात १०१०४ मांडवी एक्सप्रेस, २०११२ कोकणकन्या एक्सप्रेस, १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२२३० वंदे भारत एक्सप्रेस, १०११६ मडगाव वांद्रे एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव जागा उपलब्ध होणार आहेत.
स्लीपर कोट्यात २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर जनशताब्दीमध्ये चेअरकार व सेकंड सीटिंग या दोन्ही क्लासमध्ये आणि वंदे भारतच्या चेअरकारमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड येथील प्रवाशांना होणार आहे. भविष्यात कोरे प्रशासनाने हा कोटा टप्प्याटप्प्याने वाढवण्यास मान्यता दिली असल्याची माहिती रेल्वे अभ्यासक अक्षय म्हाब्दी यांनी दिली आहे.