दापोली:राज्य शासनाच्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत दापोली तालुक्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी २७ ते २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबवले जाणार आहे. या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि इतर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.

उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सलग तीन दिवस तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले असून रविवारी, २७ सप्टेंबर रोजी वाकवली ग्रामपंचायत कार्यालयात, सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी पालगड तिठा येथील साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात आणि मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी दाभोळ ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडेल.

या शिबिरात नागरिकांना नवमतदार नोंदणी, शिधापत्रिका, जात, उत्पन्न, रहिवासी व नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्रे, आधार कार्ड सेवा, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, विवाह आणि जन्म-मृत्यू नोंदणी, श्रावणबाळ व संजय गांधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अॅग्रीस्टॅक व फार्मर आयडी, तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी सुविधा एकाच छताखाली देण्यात येणार आहेत. याशिवाय दाभोळ येथील शिबिरामध्ये मत्स्य विभागाचे फिशरीज कार्ड आणि पीएम मत्स्य संपदा योजनेंतर्गत कर्ज योजनेची विशेष सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. दापोली तहसील कार्यालय आणि तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी या शिबिरात स्वतः उपस्थित राहून नागरिकांना थेट सेवा देणार आहेत.

तरी विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील सर्व नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून या विविध शासकीय सेवा आणि दाखल्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अर्चना बोम्बे यांनी केले आहे.