दापोली:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५४ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत डॉ. विजय विठ्ठल आवारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषि शास्त्रज्ञ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांकरिता प्रत्तेकी एक हा पुरस्कार जाहीर करण्यात येत असून, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठासाठीचा हा मानाचा पुरस्कार डॉ. आवारे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन, अध्यापन, विद्यार्थी मार्गदर्शन व शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे. डॉ. विजय आवारे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते ‘अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कृषि आणि संबंधित क्षेत्रांतील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता’ योजनेचे प्रमुख अन्वेषक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी ‘कृषि यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी’ या विषयात आचार्य पदवी पूर्ण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर पदवीच्या ९ आणि आचार्य पदवीच्या २ विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे. त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला ‘अविष्कार’ आणि ‘डीपेक्स’ सारख्या स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत.
डॉ. आवारे यांनी विशेषतः शेतकऱ्यांचे श्रम कमी करणारी आणि स्त्री-पुरुष दोघांनाही वापरण्यास सुलभअसणारी ७ कृषी अवजारे व यंत्रसामग्री विकसित केली असून अनेक तंत्रज्ञानांत सह शास्त्रज्ञ म्हणून मोलाचा वाटा उचलला आहे. यामध्ये हस्तचलित व बॅटरीचलित ‘कोकण प्रसन्न’ भात लावणी यंत्र, नाचणी मळणी व सडणी यंत्र, सुपारी सोलणी यंत्र आणि सुधारित वैभव विळा इत्यादींचा समावेश आहे. ही यंत्रे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील इतर राज्यांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत. याशिवाय त्यांनी यंत्रविक्री व यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी ‘परिभ्रमण निधी’ सुरू करून विद्यापीठाच्या महसुलातही मोलाची भर घातली आहे. त्यांच्या नावावर ४ तंत्रज्ञान व यंत्रे डिझाईन नोंदणी (Design Registrations) असून नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये त्यांचे ६१ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत; ज्यामध्ये ६ पेक्षा अधिक NAAS रेटिंग असलेल्या १७शोधनिबंधांचा समावेश आहे. त्यांनी चार पुस्तकांचे लेखन केले असून बाह्यसंस्थांमार्फत अर्थसाहाय्यित ६ संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या हाताळले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी खासगी उत्पादकांशी सामंजस्य करार करण्यात, तसेच यांत्रिकीकरण मेळावे, प्रदर्शने व सोशल मीडियाद्वारे तंत्रज्ञान प्रसारात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. डॉ. आवारे यांना यापूर्वी ‘Distinguished Service Award – 2023’, ‘Scientist of the year award 2018’ यांसारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कृषी आणि संबंधित क्षेत्रातील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता योजनेला २०२५ मध्ये ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
डॉ. विजय आवारे यांनी नमूद केले की, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील सेवेमुळेच त्यांना विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणे, शेतकऱ्यांचे
कष्ट कमी करण्यासाठी विविध अवजारे/यंत्रे विकसित करणे, त्यांचा प्रसार इत्यादी महत्वपूर्ण कामाचा समावेश आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू, सर्व संबंधित अधिकारी वर्ग तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे अधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहानामुळेच शेतकऱ्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करता आले, त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे ‘उत्कृष्ट कृषि शास्त्रज्ञ पुरस्कार २०२६’ हे पारितोषिक प्राप्त झाले असे मत डॉ. विजय आवारे यांनी याप्रसंगी व्यक्त केले
डॉ. विजय आवारे यांच्या या यशाबद्दल विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक वर्ग, सहकारी संशोधक आणि शेतकरी बांधवांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
