महाड : महाड तालुक्यातील पाने धबधबा परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला. वेदांत रामदास बोंडीलकर असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्क्यू पथकाच्या अथक शोधमोहीमेनंतर सापडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत बोंडीलकर हा मुंबईतील महात्मा गांधी नगर, सी.जी.एस. कॉलनी, सेक्टर-३, अँटॉप हिल, वडाळा (पूर्व) येथे राहत होता. तो शिक्षण घेत होता. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास तो महाड तालुक्यातील पाने धबधबा परिसरात गेला होता.

धबधब्यासमोरील नदीपात्रात तो पोहत असताना अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह वाढला आणि त्यात तो वाहून गेला. घटनेनंतर महाड तालुका पोलिसांनी तसेच स्थानिक रेस्क्यू पथकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र पहिल्या दिवशी त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली. महाड येथील एडवेंचर सोल्सचे प्रमुख विशाल खांबे आणि कोलाड येथील एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमचे प्रमुख सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सदस्यांनी नदीपात्रात शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर काही तासांनी वेदांतचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.