रत्नागिरी : कोकणात पाऊस भरपूर पडतो म्हणून उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवणार नाही, या गृहीतकावर विसंबून राहणे धोकादायक ठरू शकते. पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जाण्यापूर्वी त्याचे शास्त्रीय पद्धतीने साठवण, पुनर्भरण आणि काटेकोर नियोजन करण्याची गरज अधोरेखित करत रत्नागिरी दक्षिणमधील राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण या पाच तालुक्यांसाठी जून २०२७ पर्यंतचा अधिकृत पाणी ताळेबंद आणि निधीसह कालबद्ध जलसुरक्षा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.

निवेदनात प्रत्येक तालुक्यातील धरणे, बंधारे, तलाव, विहिरी, बोअरवेल, नैसर्गिक झरे आणि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासून गाव व वाडीनिहाय पिण्याच्या पाण्याची गरज, उपलब्ध पाणीसाठा, भूजलपातळी, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि संभाव्य टँकरची गरज यांचा स्वतंत्र ताळेबंद तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील प्रत्यक्ष पर्जन्यमान, सरासरीशी तुलना आणि भूजलपातळीतील बदल यांची माहितीही सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रत्येक तालुक्याची जलसमस्या वेगळी, आराखडाही वेगळा हवा

रत्नागिरी दक्षिणेतील पाचही तालुक्यांची भौगोलिक रचना वेगळी असल्याने एकच उपाय सर्वत्र लागू करण्याऐवजी तालुकानिहाय आणि गावनिहाय शास्त्रीय जलसंधारण आराखडा तयार करण्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

राजापूर तालुक्यात अर्जुना व कोदवली नदीखोरे तसेच किनारपट्टीच्या जलसुरक्षेला प्राधान्य देताना लहान बंधारे, समतल चर, पाझर तलाव आणि नैसर्गिक झऱ्यांच्या पुनर्भरणावर भर देण्याची मागणी करण्यात आली. लांजा तालुक्यातील डोंगराळ व पठारी भागातील विखुरलेल्या वाड्यांसाठी स्थानिक जलसाठे, झरे, पाणवठे आणि विहिरींचे पुनर्भरण करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

रत्नागिरी तालुक्यात काजळी व सोनवी नदीप्रणाली तसेच नागरी पाणीपुरवठ्याची वाढती गरज लक्षात घेऊन जलस्रोतांचे संरक्षण, गळती नियंत्रण आणि पर्यायी स्रोतांचे नियोजन करण्याची मागणी आहे. संगमेश्वर तालुक्यात शास्त्री, बाव आणि मुचकुंदी नदीखोऱ्यांचे एकात्मिक नियोजन करताना पूरप्रवाह आणि सुरक्षित विसर्गाचाही विचार करण्याची सूचना करण्यात आली आहे.

चिपळूणसाठी पाणी आणि पूर या दोन्हींचे संयुक्त नियोजन

चिपळूण तालुक्याबाबत निवेदनात वाशिष्ठी, शिवनदी आणि जगबुडी नदीखोऱ्यांचा एकात्मिक विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, चिपळूण शहराची पाणीगरज, लोटे एमआयडीसी आणि नदीवर अवलंबून असलेल्या गावांचे पाणी नियोजन यांच्यात समन्वय साधण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

विशेषतः मार्च ते जून २०२७ या कालावधीसाठी उपलब्ध पाण्याचा स्वतंत्र ताळेबंद तयार करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावे-वाड्या, टँकरची गरज, पर्यायी विहिरी आणि पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता यांची पूर्वतयारी करण्यावरही भर देण्यात आला आहे.

बोअरवेलपेक्षा भूजल पुनर्भरणावर भर

निवेदनात पाचही तालुक्यांतील निवडक निरीक्षण विहिरींची भूजलपातळी नियमित नोंदवून उन्हाळ्यात आटणाऱ्या विहिरी, कमी उत्पादन देणाऱ्या बोअरवेल तसेच खारटपणा किंवा दूषितपणाचा धोका असलेल्या जलस्रोतांचे नकाशीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नवीन बोअरवेल खोदण्यापूर्वी शास्त्रीय भूजल सर्वेक्षण करावे आणि केवळ नव्या बोअरवेलवर अवलंबून न राहता अस्तित्वातील जलस्रोतांचे पुनर्भरण आणि संवर्धन याला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

टँकर हा उपाय नव्हे, पूर्वतयारी हेच खरे जलव्यवस्थापन

जलजीवन मिशन, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि स्थानिक नळपाणी योजनांमधील अपूर्ण कामे, बंद पंप, वीजजोडणीअभावी बंद असलेल्या योजना आणि पाईपलाईनमधील गळती यांची तालुकानिहाय यादी तयार करून ती उन्हाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.

संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी पर्यायी विहिरी, पाणी अधिग्रहण, टँकर भरणा केंद्रे, पाणी गुणवत्ता तपासणी आणि वितरणाचे वेळापत्रक आधीच निश्चित करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

शेती, पशुधन, उद्योग आणि पर्यटनालाही जलआराखड्यात स्थान

पाणीटंचाईचा परिणाम केवळ पिण्याच्या पाण्यावर न थांबता शेती आणि पशुधनावरही होऊ शकतो, याची दखल घेत गावनिहाय पीक नियोजन, मातीतील ओलावा टिकवणे, सूक्ष्म सिंचन तसेच चारा बँका आणि मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्याचबरोबर लोटे एमआयडीसीसह औद्योगिक आस्थापनांचे जललेखापरीक्षण, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर तसेच हॉटेल, रिसॉर्ट आणि पर्यटनस्थळांमध्ये पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाण्याचा पुनर्वापर याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांना बाधा येणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी स्पष्ट भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

फक्त आराखडा नको, जबाबदार अधिकारी आणि अंतिम मुदतही जाहीर करा

प्रत्येक तालुक्यासाठी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक विभागांच्या समन्वयाने कृती आराखडा तयार करून प्रत्येक कामासाठी निधी, जबाबदार विभाग, पूर्णत्वाची तारीख आणि अपेक्षित परिणाम निश्चित करावेत, तसेच दर पंधरवड्याला प्रगतीचा आढावा घेऊन अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर पाठवणे ही आपत्कालीन व्यवस्था आहे, परंतु टंचाई निर्माणच होऊ नये यासाठी नियोजन करणे हे सुशासनाचे लक्षण आहे,” अशी स्पष्ट भूमिका घेत, रत्नागिरी दक्षिणमधील पाचही तालुक्यांसाठी जून २०२७ पर्यंतचा निधीसह कालबद्ध जलसुरक्षा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.

यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती

निवेदन देताना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, जिल्हा संघटक शिव सहकार सेना रत्नागिरी चंद्रकांत शिंदे, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा संघटक रत्नागिरी उमेश गुरव, रत्नागिरी उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपसरपंच सूर्यकांत तांबे, उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे, ओंकार कारेकर, परशुराम (भाई) राईन, मनोज कदम, सहदेव गुरव आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.