चिपळूण : सावर्डे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतले असून, तिच्यासोबत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या संशयित व्यक्तीलाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागासह सावर्डे व चिपळूण पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक कौतुक व आभार व्यक्त केले.

सदर प्रकरणाची नोंद होऊन तीन दिवस उलटूनही मुलीचा शोध लागला नसल्याने सावर्डे परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंता व अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी गुरुवारी सावर्डे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांना सदर प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध घेतला असून संशयित व्यक्तीलाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी चिपळूण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गेले असल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित निवेदन पोलिसांकडे सुपूर्द करून सदर प्रकरणातील संशयिताची कसून चौकशी करावी, उपलब्ध पुरावे व इतर सर्व बाबींचा सखोल तपास करावा आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधितावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीने तपास पूर्ण करावा, अशी मागणी केली.

विशेष म्हणजे, दिवाळीच्या सणकाळात गेल्या चार दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभाग, सावर्डे पोलीस ठाणे तसेच चिपळूण पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करून अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. या तपासातील तत्परतेबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेचे विशेष कौतुक केले.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अल्पवयीन मुलीची सुरक्षितता हा सर्वांत महत्त्वाचा विषय असून, या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, सखोल आणि कायदेशीर पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. संशयिताविरुद्ध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे.

तसेच या घटनेला धार्मिक रंग न देता कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. दोषी कोणत्याही धर्माचा असो, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवा सेना चिपळूण शहर अधिकारी पार्थ जगुष्टे, चिपळूण शहर सचिव प्रशांत मुळ्ये, उपतालुकाप्रमुख संदीप राणे, सावर्डे विभाग प्रमुख सागर सावंत, विभाग प्रमुख अजित गुजर, युवा सेना उपशहर अधिकारी आकाश कदम, विभाग प्रमुख राहुल गुरव, उपविभाग प्रमुख रमेश राजेशीर्के, बावाशेठ राजेशीर्के, अनंत खैर, राजूशेठ चव्हाण, शाखा प्रमुख नाना हुमणे, विवेक सुर्वे, नयन कुळे, गणेश विचारे, सुनील गुरव, विनायक वास्कर, नियाज चिकटे, रवी गावनंग आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त करताना, पुढील तपासही तितक्याच गांभीर्याने पूर्ण करून प्रकरणातील वस्तुस्थिती कायदेशीररीत्या समोर आणावी आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.