देवरुख : महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे शुक्रवारी घडलेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या परिसरात दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक येत असतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमधून व्यक्त केली जात आहे.
या ठिकाणी आर्च ब्रिज बांधण्याकरिता गतवर्षी दगड फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आले होते. यावेळी स्थानिकांनी तालुका प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षक व तालुका प्रशासनाने याकडे कानाडोळाच केल्याचे तक्रारकर्ते सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हणणे मांडले.
या ठिकाणी सुरु असलेल्या एका ब्रिजच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर आणि तीव्र सुरुंग स्फोटांमुळे मार्लेश्वर येथील डोंगरातील काहि मोठे दगड कोसळत आहेत. यापूर्वी दगड कोसळून दोन महिला भाविक जखमी झाल्या होत्या. मार्लेश्वर येथील श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी एका फूट ब्रिजचे काम सुरु आहे. काम करत असताना संबंधित ठेकेदाराकडून नदीपात्रामध्ये सर्रासपणे तीव्र स्वरुपाचे सुरुंग स्फोट घडवून आणले जात होते. प्रत्यक्ष मंदिरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आणि पायऱ्यांनजीक हे स्फोट होत असल्याने सह्याद्री पर्वताच्या या संवेदनशील भागाला मोठे हादरे बसत होते.
या निष्काळजीपणामुळे मार्लेश्वर गुहेच्या छताला आणि परिसरातील दगडांना मोठे तडे गेले असून, हा भाग हळूहळू ढासळत आहे. गेल्या आठवड्यात गुहेतून अचानक दगड कोसळल्याने दर्शनासाठी आलेली एक महिला भाविक जखमी झाली. विशेष म्हणजे, यापूर्वी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री उत्सवाच्या दिवशीही दुपारी अशाच प्रकारे सुरुंग स्फोटांच्या हादऱ्यांमुळे छताचा दगड भाविकांच्या डोक्यावर कोसळला होता, ज्यात भाविक जखमी झाल्याची चर्चा आता उघड होऊ लागली आहे. या सतत होणाऱ्या दुर्घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक पुजारी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ठेकेदाराकडून अत्यंत बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे नदीपात्रात सुरुंग लावले जात होते. यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्याला मोठी बाधा पोहचत आहे.
मंदिर परिसरातील इतर बांधकामांनाही तडे गेले आहेत. शाखा अभियंत्यांना, पोलिस प्रशासन, महसुल विभाग यांना पुर्वी कल्पना देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दगड पडल्याची हि सहावी घटना आहे. यामुळे पर्यटकांच्या जिविताचा प्रश्न एरणीवर आला आहे.
मार्लेश्वर परिसरातील अपघातामुळे पर्यटन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बेकायदेशीर मोठ मोड्या सुरुंगामुळे डोंगर कमकुवत झाल्याचा स्थानिकांचा आरोपगत डिसेंबरमध्ये तक्रार करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष
