लांजा : (गोविंद चव्हाण) शहरातील मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी लांजा नगरपंचायत प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २५ मोकाट जनावरे पकडून नगरपंचायतीच्या सुरक्षित जागी ठेवण्यात आली होती. संबंधित जनावरांच्या एकाही मालकाने ती ताब्यात न घेतल्याने आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर ही जनावरे आता लोटे येथील गोशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली.
लांजा शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत चर्चाही करण्यात आली होती. मोकाट जनावरे पकडून नगरपंचायतीच्या सुरक्षित जागेत ठेवल्यानंतरही त्यांचे मालक पुढे आले नाहीत, तर अशा जनावरांना गोशाळेत पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार आता प्रशासनाने या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने विशेष मोहीम राबवून गेल्या आठवडाभरात २५ जनावरे पकडली होती. संबंधित जनावरांच्या मालकांनी पुढे येऊन नगरपंचायतीशी संपर्क साधून ती ताब्यात घ्यावीत, असे आवाहन नगरपंचायतीने केले होते. मात्र, सोमवारअखेरपर्यंत एकाही मालकाने प्रतिसाद दिला नाही. लांजा येथील २५ गुरे व राजापूर येथील १३ गुरे खेड येथील गोशाळेत पाठविण्यात आली.
त्यानंतर लांजा येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून या जनावरांची वैद्यकीय तपासणी करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, नगराध्यक्ष सावली कुरूप आणि उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांची लोटे येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली.