खेड : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत रशीद तांबे यांचे राहते घर पूर्णपणे भस्मसात झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण घराला वेढा घातला.
या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, कपडे, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
रविवारी मध्यरात्रीपर्यंत नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी झटत होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने घरातील बहुतांश सामान वाचवता आले नाही. या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे.
या घटनेमुळे तांबे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगीमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.