दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर जेलीफिश आढळून आल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जेलीफिशच्या संपर्कामुळे अनेकांना त्वचेवर तीव्र ॲलर्जी, जळजळ आणि इतर त्रास होण्याची शक्यता असून, सकाळपासून अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या उत्साहावर जेलीफिशच्या धोक्यामुळे विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समुद्रात पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.जेलीफिशच्या संपर्कात आल्यास त्यांच्या विषारी तंतूंमुळे त्वचेवर तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. काही प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिश दिसल्यास त्यांना स्पर्श करू नये तसेच समुद्रात उतरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांना सतर्कतेचे आवाहन
आंजर्ले परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट आणि होमस्टे व्यावसायिकांनी आपल्या ठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना समुद्रातील जेलीफिशच्या धोक्याची स्पष्ट कल्पना द्यावी. समुद्रात पोहण्यासाठी जाण्यापूर्वी पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
जेलीफिशच्या संपर्कात आल्यामुळे कोणालाही त्रास जाणवल्यास विलंब न करता आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. प्रशासन आणि स्थानिक व्यावसायिकांनीही पर्यटकांमध्ये जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आंजर्लेच्या समुद्रात जेलीफिशचा धोका; पर्यटकांच्या उत्साहावर विरजण!पर्यटकांना समुद्रात उतरताना सावधगिरीचे आवाहन; रुग्णांच्या संख्येत वाढ, हॉटेल व्यावसायिकांनाही सतर्कतेच्या सूचना
