मुंबई : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा ऐकून जनाब संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा रक्तदाब वाढला आहे. या दोघांची अवस्था असरानीसारखी होत ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब हमारे पीछे’ हा संवाद म्हणण्याची वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. त्यामुळेच आज त्यांना विलीनीकरणावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करावे लागले, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. गेल्या पाच-सहा वर्षांपासून शोले आणि जंजीर चित्रपटांमधील संवाद बोलण्यापेक्षा संजय राऊत यांना सलीम-जावेद यांच्या चित्रपट कथाप्रमाणे खोट्या कहाण्या का सांगाव्या लागत आहेत याचा विचार संजय राऊतांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळी कोविडच्या काळात पत्रकारांवरही कारवाई करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला. एक कार्टून फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांचा डोळा फोडला. अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले. संजय राऊत, अनेक संपादकांना घरातून उचलून तुरुंगात टाकणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी तुम्ही मूग गिळून गप्प बसला होतात. त्यामुळे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारू नयेत. मोदी सरकारच्या काळात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानेच रोज सकाळी दहा वाजता उठून संजय राऊत यांची पत्रकार परिषद होऊ शकते. अन्यथा आणीबाणीसारखी तुमची वाचा कायमची बंद झाली असती, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले.
श्री. बन पुढे म्हणाले, संजय राऊत, तुमची मजल वायफळ आणि व्यर्थ बडबड तसेच शिव्याशाप देण्यापलीकडे जात नाही. शिव्या देण्याचे ट्रेनिंग संजय राऊतच देऊ शकतात. शिव्या देणाऱ्यांचे शिरोमणी म्हणून त्यांची ओळख आहे. मोदीजी जनतेची कामे करत आहेत, तर तुम्ही फक्त अश्लील भाषेत शिव्या देण्याचे काम करत असल्याने विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये जनतेने तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. राहुल गांधी यांच्यासह इतर कोणत्याही नेत्याचा फोन कोणीही टॅप करत नाही. मात्र, तुम्हालाच एवढी भीती का वाटते? तुम्ही पाकिस्तानधार्जिणी आणि देशविरोधी भूमिका घेता का? राहुल गांधी यांच्याविरोधात देशविरोधी कारवाईचा कोणता ठोस पुरावा आहे का? ज्या पद्धतीने तुमच्या भीती चेहऱ्यावर दिसते त्यावरून तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
सरकार एप्रिल महिन्यात जाणार, मे महिन्यात सरकार जाणार, अशा वल्गना करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर संजय राऊत यांनी द्यायला हवे. तुम्ही एप्रिलचा मुहूर्त सांगत आहात. 1 एप्रिल हा एप्रिल फूलचा दिवस असतो. आपल्या उबाठा पक्षातील आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना एप्रिल फूल करण्यासाठीच संजय राऊत एप्रिलचा मुहूर्त सांगत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एप्रिलमध्ये किंवा मे महिन्यातही कुठे जाणार नाहीत. 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि एनडीएचे सरकार सत्तेत राहणार आणि 2029 मध्येही पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएचे सरकार येईल. तुम्ही मात्र काँग्रेसच्याच दारात जाऊन बसा, असे श्री. बन यांनी सुनावले.