लांजा : कर्तव्य बजावताना समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि माणुसकी जपणाऱ्या लांजा पोलिसांच्या एका कृतीचे दर्शन लांजात दिसले असून मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी एका ज्येष्ठ नागरिकाला पाणीपुरवठ्याची पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी मदतीची गरज भासली असता तेथून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पोलीस शिपायाने कोणताही संकोच न करता स्वतः जमीन खोदून त्यांना मदत केली.

लांजा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक श्रीनिवास देशपांडे यांच्या जमिनीतून जाणारी पाण्याची पाइपलाइन फुटली होती. ती दुरुस्त करण्यासाठी देशपांडे हे स्वतः जमीन खोदण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वयोमानामुळे त्यांना हे काम करणे शक्य होत नव्हते. याचवेळी तेथून मॉर्निंग वॉकसाठी जात असलेले पोलीस शिपाई निलेश कळवस, नेमणूक गोडनिंब टॅप महामार्ग पोलीस, यांनी ही बाब पाहिली. सध्या लांजा येथे बंदोबस्तासाठी आलेल्या कळवस यांनी तत्काळ पुढाकार घेत स्वतः जमीन खोदून पाइपलाइन दुरुस्ती व बसविण्यासाठी देशपांडे यांना मदत केली.

पोलीस शिपाई निलेश कळवस यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाची दखल घेत संबंधित प्रभागाचे नगरसेवक योगेश कावतकर यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी प्रशस्तीपत्रक देऊन पोलीस शिपाई कळवस यांचा गौरव केला.