रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘समाधान समारोह 2026’ उपक्रमांतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद वाय. जाधव तसेच जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी केले आहे.
‘समाधान समारोह 2026’ अंतर्गत प्रकरणे संदर्भित करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांना परस्पर समन्वय आणि तडजोडीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
तडजोडपात्र प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये सामंजस्याने निकाली काढण्यासाठी संबंधित पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष लोकअदालतीबाबत अधिक माहितीसाठी ८५९१९०३६०८ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२३५२-२२४७६८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.