(चिपळूण) : ​चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार, २३ एप्रिल रोजी भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गोवळकोट येथे प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
​ही स्पर्धा रात्री ९ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण, शिंदेवाडी (गोवळकोट) येथे रंगणार आहे. जिल्ह्यातील विविध नामांकित नृत्यसंघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सादर होणारे जोशपूर्ण पालखी नृत्य, आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणातील समन्वय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
​पालखी नृत्य ही आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख जपणारी लोककला असून, या स्पर्धेद्वारे या कलेचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि युवकांमध्ये पारंपरिक कलेविषयी आवड निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.