दापोली : राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज, दापोलीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे मुरुड समुद्रकिनारी ‘सागरी तट स्वच्छता अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात एनएसएसच्या द्वितीय वर्षातील ६० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्वयंसेवकांनी मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक, कचरा व अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून किनाऱ्याची स्वच्छता केली. समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासोबतच सागरी प्रदूषण रोखणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. निवास देसाई आणि डॉ. विजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानात एनएसएस सदस्य डॉ. पूनम पानस्कर, प्रा. उत्कर्षा गुरव आणि श्री. विश्वेष जोशी यांनीही सक्रिय सहभाग घेत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ‘स्वच्छ किनारा, सुरक्षित पर्यावरण’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत स्वयंसेवकांनी मुरुड समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले.