मंडणगड : ग्रामसेवा विकास मंडळ आतले (रजि.) यांच्या वतीने ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा–२०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. १६ सप्टेंबर २०२६ रोजी आतले येथील सिद्धिविनायक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंडळाचे संस्थापक अर्जुन दोडकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंडळाचे अध्यक्ष अनंत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यक्रम पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, मेहनत, सातत्य आणि ध्येय निश्चिती यांचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत देव्हारेचे उपसरपंच तुषार करावडे तसेच आतले गावच्या पोलीस पाटील सौ. सपना करावडे यांची विशेष उपस्थिती लाभली. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे सचिव परेश वारसे यांनी केली, तर सूत्रसंचालन मंडळाचे उपसचिव दर्शन पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, सदस्य, पालक, ग्रामस्थ, महिला व हितचिंतकांचे मंडळाचे अध्यक्ष अनंत चव्हाण यांनी मनःपूर्वक आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा हा गुणगौरव सोहळा आतले गावाच्या शैक्षणिक वाटचालीतील प्रेरणादायी उपक्रम ठरला.