दापोली : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षक-विद्यार्थी नाते हे जिव्हाळ्याचे आणि अस्सल असते, असे प्रतिपादन जि.प. सदस्य किशोरभाई देसाई यांनी केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा दापोलीच्या वतीने यशवंत व गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा, शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक तसेच नवनियुक्त शिक्षकांचा गुणगौरव सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला. यावेळी जि.प. शाळा खाजगी शाळांपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे नमूद करत किशोरभाई देसाई यांनी जि.प. शाळांचे अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पंचायत समितीच्या उपसभापती नम्रता तोडणकर यांनीही जि.प. शाळांच्या कार्याचे कौतुक केले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे आणि जडणघडणीकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रवीण काटकर यांनी शिक्षकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतानाच समाजभान जपत विविध सामाजिक उपक्रमही राबविले जात असल्याचे सांगितले.

या गुणगौरव सोहळ्यास जि.प. सदस्य प्रभाकर गोलांबडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, संदीप चिखले, श्रीराम इदाते, नरेश घरटकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभाग दापोलीचे शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, अनिल सुकाळे, गणेश पवार, सर्व केंद्रप्रमुख, संघटना प्रतिनिधी, ४०० हून अधिक शिक्षक तसेच तालुक्यातील यशवंत व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भगिनींनी सुस्वर स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांच्या शाळांसह तालुक्यातील शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि नवनियुक्त शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ऋणनिर्देश तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी केले. सूत्रसंचालन वैभव बोरकर व अनुराधा देसाई यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल शिक्षक संघटनेच्या संपूर्ण परिवाराने विशेष मेहनत घेतली.