लांजा (गोविंद चव्हाण) : उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी मंगळवार, २३ जून रोजी लांजा शहरातील संकल्प सिद्धी हॉल येथील पोलीस सभागृहात एमडीडीसी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी पोलीस मुख्यालयातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी दंगा नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या उपाययोजना तसेच विविध उपकरणांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात पोलीस उपनिरीक्षक बोकेफोडे, डीआय हेड कॉन्स्टेबल सार्दळ आणि डीआयएल हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी दंगा नियंत्रणाच्या पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करत प्रात्यक्षिकांसह डेमो सादर केला. संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि तांत्रिक बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रशिक्षणादरम्यान लाठी सेक्शन, ढाल सेक्शन तसेच हँड ग्रेनेड सेलच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दंगलीसारख्या संवेदनशील परिस्थितींमध्ये पोलीस दलाने समन्वयाने आणि प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक बाबींचा सरावही करण्यात आला.