चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील नावाजलेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्यपदी प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, “आपलं चिपळूण” संस्थेचे उपाध्यक्ष आणि अपरान्त हॉस्पिटलचे संचालक श्री. प्रशांत पाटेकर यांची सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली आहे .
संस्थेचे विश्वस्त सुप्रसिद्ध डॉ. यतिन जाधव यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्रीराम एज्युकेशन सोसायटी ही सर्वसामान्य जनतेची संस्था असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या अंतर्गत शिशुविहार, सौं अपर्णाताई मेहंदळे प्राथमिक शाळा, परांजपे मोतिवाले हायस्कूल आणि आनंदराव पवार महाविद्यालय कार्यरत आहेत.
यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रशांत देवळेकर यांनी सांगितले की, श्री. प्रशांत पाटेकर यांच्यासारख्या मान्यवर व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा संस्थेला लाभ होणे ही संस्थेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. श्री पाटेकर यांच्या व्यवसायाची व्याप्ती नवी मुंबई, मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रा मध्ये सोलापूरपर्यंत असून विधानभवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा मान्यवर संस्थांबरोबरील विविध कामांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनाही सहकार्य केले आहे.