पोलादपूर (प्रतिनिधी)-समाजात घडणाऱ्या घटना व प्रश्नांवर सत्य आणि नि:पक्षपाती दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथील सोमाणी परिसर, वाटाणे लॉन येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन व पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. उद्धाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. दिनकरराव वाटाणे होते. विशेष उपस्थिती म्हणून भागवताचार्य प.पू. रमाकांत व्यास, प.पू. गजानंद माऊली, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, विदर्भप्रमुख नयन मोंढे, पंढरपूरचे राजेंद्र कोर्टे पाटील, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व मातोश्री स्नेहलता सोमाणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांच्याहस्ते करण्यात आले.
या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान देण्यात आला. भागवताचार्य डॉ. रमाकांत व्यास यांना ‘संत सेवाश्री’, दिनकरराव वाटाणे यांना ‘वारकरी सेवा’, हेमराज लाहोटी, हरीश बाहेती, सरोज बाहेती यांना ‘विदर्भ भूषण’, श्रीमती शिलाताई राठी व ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध समाजसेवक, उद्योजक, पत्रकार व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक व ‘विश्व कल्याण प्रार्थना’ प्रदान करण्यात आली. रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्यासह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
द्वितीय सत्रात ‘पत्रकारांचा डीएनए काय?’, ‘सायबर युगातील माध्यमे व मूल्यनिष्ठ पत्रकारिता’ या विषयांवर चर्चासत्र झाले. ज्येष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे यांनी सत्य, संयम व समाजहित हाच पत्रकाराचा खरा डीएनए असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबाबत पत्रकारांनी सजग राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पत्रकारांसाठी ‘लाडका पत्रकार योजना’ सुरू करण्याची मागणी मांडली.
15 ठरावांना एकमुखी मंजुरी
अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लघु वृत्तपत्रांना जीएसटीमधून सूट देण्यात यावी, ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीच्या अटी शिथिल करण्यात याव्यात, महापुरुषांच्या जयंतीप्रमाणेच महिलाउध्दारकांच्याही जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून दर्शनी जाहिराती द्याव्यात. अधिस्विकृती पत्रासाठीच्या अटी सुलभ कराव्यात. शासनमान्य यादीवर नसलेल्या नियमित वृत्तपत्रांना 4 जाहिराती सुरू करा, पत्रकारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना व इतर आवास योजनांमध्ये आरक्षण द्यावे, आरटीई कायद्यातून संपादक व पत्रकारांच्या पाल्यांसाठी विशेष आरक्षण व सवलती द्या, पीआरजीआय प्रेस सेवा पोर्टलप्रमाणे युटयुब व डिजिटल पोर्टल माध्यमांच्या नोंदणीसह अधिकृत प्रमाणपत्र द्यावे, अधिस्विकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन मंडळाच्या रातराणी शिवाई ई-बस सेवेत इतर बसेसप्रमाणे प्रवास सवलत द्यावी, सत्यवृत्तांना रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हक्कभंग तरतुदींचा रद्द करून माध्यम व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवा, पत्रकार कल्याणकारी मंडळ व वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या यापुर्वीच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, वृत्तपत्र नोंदणी व दुरुस्तीसाठी आकारली जाणारी फी व बाँडवरील शपथपत्राची अट रद्द सर्व सेवा मोफत कराव्यात, या 15 महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. ठरावांचे वाचन डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी एकमुखाने ठरावांना मंजुरी दिली. यावेळी राज्यभरातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
