ओमळी : ओमळी गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्येष्ठ पत्रकार सुभाषजी कदम आणि व्हाईस चेअरमनपदी सुभाषजी जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार भास्करराव जाधव यांनी त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमदार भास्करराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या सत्कारप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुयोग कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार सुभाष कदम यांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक भान आणि सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क, तर सुभाष जाधव यांचे संघटनकौशल्य, नेतृत्वगुण आणि सहकार क्षेत्रातील योगदान यामुळे ओमळी सोसायटीला सक्षम नेतृत्व लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून सोसायटीचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि सभासदहिताचा होईल. शेतकरी आणि सभासदांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नवनिर्वाचित चेअरमन सुभाष कदम, व्हाईस चेअरमन सुभाष जाधव तसेच सर्व संचालक मंडळाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
