खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथे मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे कोसळलेल्या दरडीचा मलबा सुमारे १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका मार्गिकेवरून हटविण्यात यश आले. त्यानंतर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून दोन्ही बाजूंना अडकून पडलेली वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहेत.

रात्री अडीचच्या सुमारास मोठी दरड महामार्गावर कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना तब्बल १२ तास महामार्गावरच अडकून राहावे लागले.

घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रशासन, पोलीस तसेच यंत्रसामग्रीच्या मदतीने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. सततच्या प्रयत्नांनंतर एका मार्गिकेवरील मलबा हटविण्यात यश आल्याने दुपारनंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर अडकून पडलेली वाहने नियोजनबद्ध पद्धतीने मार्गस्थ केली जात आहेत.

दरम्यान, दुसऱ्या मार्गिकेवरील दरडीचा मलबा हटविण्याचे काम अद्याप सुरू असून महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. नागरिकांनी आवश्यकतेशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.