पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली व डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली त्या पुणे शहरात मुलींसाठी विशेष छात्रों की गुंज कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छात्रों की गुंज हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून तो सर्वांसाठी खुला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.
राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम शनिवार दि. २२ ॲागस्ट रोजी पुण्याच्या SSPM मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज काँग्रेस नेत्यांनी केली त्यानंतर मैदानातच आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ज्येष्ठ नेते CWC चे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिश्ती, मनोज त्यागी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्य़क्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस (पूर्व) चे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम अध्यक्ष दिप्ती चवधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, २०१४ साली भाजपा सत्तेत आल्यापासून बहुजनांचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने आर्थिक लोभाच्या मोबदल्यात संधी देण्याचा सपाटा लावला आहे. व्यापम घोटाळा आता देशभर पसरला आहे, नीट परिक्षा, न्यायालयातील भरती परीक्षा, टीईटी परिक्षा अशा सर्व परिक्षामध्ये घोटाळे होत असून पेपर फुटीचे ग्रहण लागले लागले. वन नेशन, वन इलेक्शन, याप्रमाणे वन नेशन, वन एक्झामिनेशन लागू करत विशिष्ट जातीवर्ग व पैसे देऊन पेपर विकणे, पक्ष फोडाफोडी करून वन नेशन, वन पार्टी करण्याचा भाजपाचा डाव आहे. परीक्षा आणि शिक्षण या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. मागील १२ वर्षात १५४ वेळा पेपर फुटले आहेत, त्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दिला पण मोदी-शाह यांनी चर्चेपासून पळू काढला. शिक्षण व्यवस्था कशी असावी यासाठी व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज अभियान सुरु केले आहे.
