मुंबई : विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे. गेल्या १० ते १२ वर्षांत जाती-धर्माच्या मुद्द्यांना प्राधान्य देत राजकारणाची दिशा बदलली गेली, पक्ष फोडण्याचे राजकारण झाले, निवडणुकांमध्ये पैशांचा वाढता वापर झाला आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. हे गलिच्छ राजकारण आणि शहरांचे बकाल होत चाललेले रूप बदलण्याची गरज आहे. शहरांचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास व्हावा, असे ज्यांना वाटते, अशा सर्वांसाठी ‘शहर परिवर्तन गट’ हे खुले व्यासपीठ आहे. ही केवळ काँग्रेसची मोहीम न राहता लोकचळवळ बनावी, यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि ‘शहर परिवर्तन गटा’चे अध्यक्ष सचिन सावंत यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालय टिळक भवन येथे आज ‘शहर परिवर्तन गटाचे’ उद्घाटन करण्यात आले. यावेळी AICC सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे, अॅड. संदेश कोंडविलकर, मा. दिनेश कांबळे, प्रशिक्षण विभाग प्रमुख आशुतोष शिर्के यांच्यासह MMR विभागातील विविध शहरांचे काँग्रेस अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जनसंघटनांचे प्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सचिन सावंत म्हणाले की, ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्याचा मोठा ताण नागरी पायाभूत सुविधांवर पडत आहे. नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सोयी आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन मिळणे ही शहर विकासाची प्राथमिक गरज आहे. मात्र, सत्ताधारी या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी जाती-धर्माच्या मुद्द्यांवर राजकारण करून जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहेत.
शहरातील नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य, सुरक्षित आणि दर्जेदार व्हावे, शहरांचा नियोजनबद्ध विकास व्हावा आणि नागरिकांच्या प्रश्नांना शासन-प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ असावे, या भूमिकेतून काँग्रेसने ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन केला आहे.