मुंबई : भारताच्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी निवडणूक आयोग आता ‘इलेक्शन कमिशन’ न राहता भाजपचा ‘सिलेक्शन कमिशन’ बनल्याचा आरोप केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांच्यातील टोकाचा संघर्षाचे पार्श्वभूमीवर आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, एसआयआर प्रक्रियेवरही वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेत ह्या प्रक्रियेवर राज्यातील जनतेने रस्त्यावर उतरून बहिष्काराचे आवाहन देखील केले आहे.
एसआयआर प्रक्रियेबाबत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत, राज्यात दोन कोटी पेक्षा अधिक मतदार वगळण्यात आले आहेत. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ही प्रक्रिया जनतेवर थोपवली जात असल्याचा आरोप करत वंचितने महाराष्ट्रातील जनतेने एसआयआर प्रक्रियेवर पूर्ण बहिष्कार टाकावा, अशी भूमिका घेतली आहे.
मतदार यादीच्या पुनरावलोकनाच्या नावाखाली मतदारांच्या अधिकारां बाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जनतेच्या विश्वासात घेऊन करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून जाब विचारला पाहिजे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदानाच्या आकडेवारीचाही वंचित कडून संदर्भ देण्यात आला आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील मतदानाची आकडेवारी ५८.२२ टक्के होती.त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी ६६.०५ टक्क्यांपर्यंत पोहोचली.या फरकाचा अर्थ अंदाजे ७६ लाख मतांचा फरक असा होतो.या वाढीबाबत वंचित पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.५ ते ६ वाजेदरम्यान सुमारे ७६ लाख मतांची नोंद झाल्याबाबत आक्षेप नोंदवला होता.न्यायालयात बाळासाहेब आंबेडकर यांनी याचिका देखील दाखल केली होती.मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप नाकारले होते.आयोगाच्या म्हणण्यानुसार मतदान केंद्रावर तयार होणाऱ्या फॉर्म १७ सी मध्ये नोंदवलेली मतदानाची संख्या उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींना दिली जाते आणि ती बदलता येत नाही असा दावा करण्यात आला होता.मतदान केंद्रांकडून आकडेवारी एकत्रित करून अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यास वेळ लागत असल्याचे आयोगाने दिशाभूल केली होती. मतदानाच्या आकडेवारीतील एवढ्या मोठ्या फरका बाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर पुरेशी आणि समाधानकारक कार्यवाही झाली नाही तसेच मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने अधिक पारदर्शकता दाखवण्याची गरज होती. मात्र निवडणूक आयोग मॅनेज करण्यात आला आहे.त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला आयोगाचे कार्यालयावर लावण्यासाठी ‘Election Commission of BJP’चा फ्लेक्स वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेशकडून मोठा फ्लेक्स पाठवण्यात येणार असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले आहे.
एस आय आर प्रक्रिया, मतदार यादीतील बदल, मतदानाच्या आकडेवारीतील फरक आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोग उघडा पडला आहे, ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा देऊन बाहेर पडावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. दरम्यान, एस आय आर आणि मतदानाच्या आकडेवारी बाबत निवडणूक आयोगाची अधिकृत भूमिका संशयास्पद आणि बनवा बनवीची होती.